Subscribe:

Ads 468x60px

.

Monday 19 September 2011

एच.आय.व्ही आणि एडस् : कारणे व प्रसार

एच.आय.व्ही आणि एडस्

कारणे व प्रसार
हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो. तसेच दूषित रक्त दिल्याने, इंजेक्शनच्या दूषित सुया वापरल्याने, आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला हा आजार होण्याची शक्यता असते. म्हणजे हा आजार रक्तसांसर्गिकही आहे. या रोगाचे आपल्या देशातील प्रमाण वाढत आहे. पुरेशा सार्वजनिक आरोग्यसेवा नसल्याने तसेच डॉक्टरांच्या व जनतेच्या योग्य आरोग्यशिक्षणाअभावी त्याचा प्रसार आटोक्यात आणणे आपल्या देशात कठीण जात आहे. सर्वांनाच या आजाराची माहिती असणे आवश्यक आहे.
या आजारात शरीरातील संरक्षक पेशींची यंत्रणा कोलमडून पडल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. जुलाब, ताप, न्यूमोनिया, इत्यादी आजारांनी खंगत रुग्ण दगावतो.
एचायव्ही विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीकडून, भिन्नलिंगी वा समलिंगी संबंधातून, तसेच रक्तामार्फत हा आजार पसरतो.
चुंबन, स्पर्शातून, एकत्र खाण्यातून, डासांमार्फत, अन्न-पाणी, कपडयांतून, बाळाला अंगावर पाजण्यातून हा आजार पसरत नाही.
पुरुषाच्या बाहेरख्यालीपणामुळे कुटुंबातील स्त्रीला हा आजार होण्याचा धोका वाढत आहे. यामुळे असंख्य कुटुंबामध्ये हा आजार येऊन पोचलेला आहे. लग्नाआधीचे लैंगिक संबंध सहसा गुप्त ठेवले जातात; मात्र एड्स प्रकट व्हायला वेळ लागत असल्याने लग्नाच्या वेळी सगळेच अंधारात राहतात. इथून पुढे कुंडली पाहाण्याऐवजी भावी जोडीदाराची एड्सबद्दल खात्री करणे गरजेचे होणार आहे. विवाहाबरोबर एड्सचा धोका पत्कारायचा का हा प्रश्न असेल.
प्रतिबंधक काळजी
संयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक संबंधात निरोध वापर अशी या आजाराविरुध्द त्रिसूत्री आहे.
सर्वप्रथम अनिर्बंध लैंगिक संबंध टाळणे महत्त्वाचे आहे. एकाच व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित असते. लैंगिक संबंधातली व्यक्ती एड्सग्रस्त असण्याची शक्यता असेल तर अशा संबंधात निरोध वापरावा.
अनावश्यक इंजेक्शने टाळणे महत्त्वाचे. बहुतांश इंजेक्शने अनावश्यक असतात! इंजेक्शनांसाठी वापरण्यात येणा-या सुया व सिरींज पॅकबंद असव्यात. एकदा वापरानंतर त्या मोडून टाकून द्यायला पाहिजेत.
रक्तातून हा आजार पसरत असल्याने रक्तपेढयांबद्दल कडक कायदे आहेत. आता एड्ससंबंधी चाचणी केल्याशिवाय रक्त देता येत नाही.
रक्त घेण्याची वेळ आल्यास 'निरोगी' माणसाचे रक्त घ्यावे. शक्यतो आपापल्या नात्यातल्या व्यक्ती किंवा मित्रांचे रक्त व तेही दात्याच्या रक्ताची एड्सबाबत तपासणी करूनच घ्यावे लागते. व्यावसायिक रक्तदात्यांचे रक्त हल्ली घेतले जात नाही हे चांगलेच आहे.
इंजेक्शनद्वारे मादक पदार्थ घ्यायचे व्यसन असणा-या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते. आपल्या देशात आसाम, मणिपूर, इ. भागात या प्रकारची मोठी समस्या आहे. व्यसन सुटत नसेल तर त्यांना निर्जंतुक सुया उपलब्ध करण्याची गरज आहे.
रोगनिदान

एड्सच्या विषाणूंची लागण झाल्यावर अनेक दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. इतर लिंगसांसर्गिक आजारांप्रमाणे त्याची लक्षणे लैंगिक अवयवाभोवती नसतात, हे लक्षात ठेवा.
मुख्य लक्षणे
- वजनात सतत व मोठया प्रमाणावर (10% हून जास्त) घट होणे.
- सारखे जुलाब होणे (एक महिन्याहून जास्त काळ).
- सतत ताप येत राहणे (एक महिन्याहून जास्त काळ).
इतर लक्षणे
सतत खोकला, कातडीवर खाज, वारंवार आजार, नागीण, हर्पिस,(पुरळ) तोंडातील बुरशी वाढणे, अंगावरील गाठी सुजणे व हातापायाच्या नसांना सूज येणे, इत्यादींपैकी काही खाणाखुणा आढळू शकतात. यासंबंधी इतर कुठल्याही आजाराची शक्यता नसल्यास एड्सची शक्यता धरावी.
रक्त तपासणी
एचायव्ही साठी एलायझा तपासणीने एड्स-विषाणूंविरुध्द प्रतिकण (प्रतिपिंडे-ऍंटीबॉडी) तयार झाल्या आहेत की नाहीत हे कळते. (एड्स आजार म्हणजे तक्त्यात दिलेली लक्षणे- चिन्हे असणे) संसर्ग झाल्यापासून निदान 3-4 आठवडे तपासणीत दोष आढळत नाही, त्यानंतर आढळतो. तपासणीत दोष कळल्यानंतर प्रत्यक्ष आजार व्हायला 5-10 वर्षेपर्यंत काळ जाऊ शकतो. या तपासणीत काही वेळा चूक होऊ शकते. म्हणूनच एका तपासणीवर अवलंबून न राहता दोन तपासण्या करूनच निश्चित सांगता येते.
एचायव्ही बाधित आणि एड्सग्रस्त रुग्णाची रक्ततपासणी अत्यंत महत्त्वाची असते. यात एड्स विषाणूची संख्या आणि रुग्णाची एकूण प्रतिकारशक्ती यांचा अंदाज घेतला जातो. सध्या खालील तपासण्या महत्त्वाच्या आहेत.
1. एचायव्ही एलायझा - ही विषाणू प्रतिघटकाची तपासणी आता स्वस्त आणि ब-यापैकी अचूक झाली आहे. लागण झाल्यापासून आठवडयात ही रक्ततपासणी निदर्शक (सदोष) ठरु शकते. मात्र ही शेवटी एक अदमासे तपासणी आहे. म्हणून ती दोनदा करतात. दोनदा केल्यास ती ब-यापैकी पक्की रक्ततपासणी ठरते. एलिसा तपासणीचा उपयोग चाळणी म्हणून (स्क्रिनिंग) सर्वत्र केला जातो.
2.वेस्टर्न ब्लॉट - या रक्ततपासणीमुळे एचायव्ही-एड्सचा विषाणू आहे की नाही ते कळते आणि त्याचा उपप्रकार (टाईप) कळतो. या तपासणीत विषाणूंच्या प्रथिनांची 'ओळख परेड' केली जाते. म्हणजे विषाणू आहेत की नाही याचा परिस्थितीजन्य पुरावा मिळतो.
3. सीडी फोर/सीडी4 प्रमाण - सीडी 4 हा रक्तातील पांढ-या पेशींचा एक उपप्रकार आहे. निरोगीपणात रक्तात या पेशी 500-1400 या प्रमाणात असतात. ही तपासणी प्रतिकारशक्ती व आजाराची पायरी ओळखण्यासाठी उपयुक्त आहे. सीडी 4 पेशींचे प्रमाण जसे खाली जात राहते तशी लक्षणे-चिन्हे दिसतात. सुरुवात (500 सीडी 4 पेशी) बुरशीदाहाने होते. यानंतर (200-500 पेशी) फुप्फुसदाह व्हायला लागतो. पेशीप्रमाण जंतुदोषाने आणखी खाली गेले की अंतर्गत आजारांचे प्रमाण व प्रकार वाढत जातात. याचबरोबर टी.बी., हार्पिस-कांजण्या वगैरे आजार दिसू लागतात.
4. विषाणू-भार - रक्तातील विषाणूभार मोजणे ही एक महत्त्वाची व थेट तपासणी आहे. सीडी 4 तपासणीपेक्षा ही जास्त चांगली असली तरी ती सध्या फार महाग आहे. विषाणू-भार कमी होणे ही आजार नियंत्रणाची महत्त्वाची खूण आहे.
5. डी-24 तपासणी - ही रक्ततपासणी एलिसा तपासणीच्या आधी विंडो पिरियडमध्येच विषाणूच्या आगमनाबद्दल सांगू शकते. मात्र ही तपासणी क्वचितच केली जाते.
6. हल्ली बहुतेक लॅबमध्ये तयार किट वापरून तपासणी केली जाते. याचे तंत्र वेगळेच आहे.
उपचार
एचायव्ही केवळ विषाणू-बाधित अवस्था आहे. एड्स म्हणजे रोगलक्षणे व चिन्हे असलेली अवस्था.
खालीलपैकी कोणतीही परिस्थिती दिसल्यास उपचार सुरु करावे लागतात.
(अ) सीडी4 प्रमाण 350 च्या खाली गेल्यास.
(ब) मूळ आजाराच्या जोडीने येणारे जंतुदोष
(क) विषाणू-भार 30000 पेक्षा वाढणे.
या आजाराचे एकूण गुंतागुंतीचे स्वरुप आणि त्यातल्या कौटुंबिक, सामाजिक समस्या लक्षात घेऊन समुपदेशनाची आवश्यकता असते. केवळ औषधोपचार करणे बरोबर नाही. सध्या सर्व शासकीय रुग्णालयात समुपदेशक उपलब्ध आहेत. समुपदेशक रुग्णाला सर्व माहिती सांगून अडचणी जाणून घेऊन, योग्य सल्ला देतात.
या आजारात मधुमेह किंवा अतिरक्तदाबाप्रमाणे कायम उपचार घ्यावे लागतात. मात्र चांगल्या उपचारांमुळे हा घातक आजार आता असाध्य राहिलेला नाही, ही मोठी शास्त्रीय प्रगती आहे.
याबरोबर दर सहा महिन्याला रक्ततपासणी करून उपचाराचा उपयोग किती होतो ते तपासावे लागते. याबरोबर औषधांचे दुष्परिणाम कळण्यासाठी इतर रक्ततपासण्या पण कराव्या लागतात.
समुपदेशन व उपचार
एच.आय.व्ही किंवा एड्स तपासणी व पुढील उपचार करण्यासाठी माहीतगार समुपदेशकांची गरज असते.
एच.आय.व्ही. तपासणी सदोष (पॉझिटिव्ह) आहे हे रुग्णाला सांगणे हे फार जबाबदारीचे व कौशल्याचे काम आहे. यामुळे जाणकार व्यक्तीला प्रचंड मानसिक धक्का बसू शकतो. पण काय काय करता येते याबद्दल नीट माहिती टप्प्याटप्प्याने द्यायला हवी. आजार लगेच होत नाही, त्याला अद्याप वेळ आहे हेही सांगायला हवे.
बाधित व्यक्तीच्या पती/पत्नीस (किंवा लैंगिक जोडीदारास) या संसर्गाची/आजाराची बातमी देणे आवश्यक आहे; अन्यथा प्रतिबंधक काळजी घेताच येणार नाही. मात्र हे सांगताना मानवी सहानुभूती, धीर देणे, योग्य काळजीसाठी (निरोध) नीट सल्ला देणे, इ. अनेक अंगे सांभाळावी लागतात. रुग्ण स्वतः हे करू शकल्यास उत्तमच; पक्ष समुपदेशकाची या कामात मदत घ्यायला पाहिजे.
प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वारंवार होणा-या इतर आजारांवर उपचार करणे महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच हा दुर्धर आजार झालेल्या रुग्णास मानसिक आधाराची गरज असते, हे ओळखून त्याच्याशी सहानुभूतीने वागणे जरूरीचे असते.
एड्ससाठी अजून चांगली विषाणू-विरोधी औषधे नाहीत. काही औषधे उपलब्ध आहेत त्याने आजार लांबू शकतो. त्यांचा खर्च सध्या जास्त आहे व त्यांचे काही दुष्परिणामही होतात. एकूण यात फायदेतोटे पाहून, खर्चाचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.
रुग्णसेवेत काळजी घ्यावी
रुग्णालयात वा घरी रुग्णाची काळजी घेत असताना इतरांनी त्यापासून दूर राहण्याची काही गरज नाही. मात्र वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. तसेच रुग्णाचे कपडे, अंथरुण वगैरेंवर रक्त सांडले असेल किंवा ते दूषित झाले असल्यास निर्जंतुक करून घ्यायला हवे.
एड्स आजार असताना क्षयरोग होण्याची शक्यता फार असते. कारण रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे एड्सच्या प्रसाराबरोबर क्षयरोगही वाढायची भीती असते.
औषधोपचार
एड्ससाठी हल्ली बहुविध औषधोपचार पध्दती प्रचलित आहेत. यात तीन औषधे असतात. आता एकाच गोळीत तिन्ही औषधे असलेली उपचारपध्दती उपलब्ध आहे.
HAART म्हणजे अत्यंत परिणामकारक उपचारपध्दती. ही तीन औषधांची उपचारपध्दती असल्याने विषाणूभार वेगाने कमी होतो आणि सीडी 4 प्रमाण वाढते. या औषधोपचाराचा खर्च महिना हजार-बाराशे पर्यंत जातो. सर्वांना मोफत औषधोपचार अद्याप शक्य झालेला नाही.
काही रुग्णांच्या बाबतीत औषधोपचारांचा अपेक्षित फायदा होत नाही किंवा दुष्परिणाम जाणवायला लागतात. अशांच्या बाबतीत औषधे बदलावी लागतात. याशिवाय इतर आजारांसाठी उपचार करावा लागतो.
मातेपासून पोटातल्या गर्भाला संसर्ग होऊ नये म्हणून औषधोपचार - सुमारे 1% गरोदर स्त्रियांना एचायव्ही-एड्सची बाधा आढळते. अशावेळी गर्भपात करायचा की गर्भ वाढू द्यायचा याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. गर्भ वाढू द्यायचा असल्यास औषधोपचाराने गर्भाचा संसर्ग टाळता येतो. मात्र यात 50% यश मिळते. काही बाबतीत यश मिळत नाही.
एड्स आणि टी.बी.
एड्सच्या रुग्णांना टी.बी. होतो असे दिसून आले आहे. आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीस कधी ना कधी टी.बी. जंतूंची लागण होऊन गेलेलीच असते. बहुतेकांची टी.बी. लागण बरी झालेली असते पण काही जंतू शिल्लक असतातच. ते एक प्रकारे पांढ-या पेशींच्या तुरुंगात असतात. एड्स आजारात पांढ-या पेशींची संख्या कमी झाल्यावर टी.बी.चे हे जंतू 'तुरुंग फोडून' मोकळे होतात. त्यांची संख्या वाढायला लागते. यातूनच टी.बी. आजाराचा पुनर्जन्म होतो. म्हणूनच टी.बी. एड्सचा एक साथीदार असतो. सध्या भारतात टी.बी. रुग्णांपैकी 15% रुग्ण एड्सग्रस्त असतात.
एड्समध्ये होणारा टी.बी. फारशी लक्षणे नसलेला, झाकलेला आजार असू शकतो. मात्र त्यांच्या फुप्फुसात टी.बी.चे पुष्कळ जंतू आढळतात. ते बेडक्यात मोठया संख्येने दिसतात. फुप्फुसे मात्र क्ष-किरण चित्रात निरोगी दिसतात आणि खोकला, बेडक्यात रक्त वगैरे टी.बी.ची नेहमीची लक्षणेही दिसत नाहीत.
एड्स रुग्णांना फुप्फुस सोडून इतर टी.बी. चा आजारही सहज होऊ शकतो. यात पाठीचे मणके, जननसंस्था, मेंदू-आवरण वगैरे जागांमध्ये टी.बी. होऊ शकतो.
टी.बी.चा आजार झाला की शरीरात एड्स वेगाने वाढायला मदत होते.
एड्सच्या रुग्णांना कमी प्रतिकारशक्तीमुळे टी.बी.ची नवी जंतुलागणही सहज होऊ शकते. जेव्हा हे रुग्ण सामान्य रुग्णालयात जातात तेव्हा इतरांचे जंतू त्यांना सहज लागू शकतात.
एड्स आणि टी.बी. रोगाचे असे विशेष नाते आहेत. यामुळे एड्स असेल तर टी.बी. ची तपासणी करावी लागते. तसेच टी.बी असेल तर एड्स ची तपासणी करावी लागते.
म्हणूनच प्रत्येक एड्स रुग्णाला टी.बी. होऊ नये म्हणून 2 टी.बी. प्रतिबंधक औषधे 6 महिने देणे उपयोगाचे आहे.

विवाहपूर्व चाचणी

लग्ना आधी ही चाचणी करावी की नाही हा स्वेच्छेचा प्रश्न झाला. मुळात ही चाचणीच ऐच्छिक आहे. म्हणून ही चाचणी मोफत करण्यात येणार्‍या केंद्रास व्हीसीटीसी सेंटर ( व्हॉलुंटरी टेस्टींग अँड काउन्सेलिंग सेंटर ) असं म्हटलं जातं. पीसीआर ( पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन ) ने बिनचूक निदान होते व त्यात इन्फेक्शन विंडो पीरीयड मधे असलं तरी कळू शकतं ..म्हणजे टेस्ट तरीही पॉझिटिव्ह येते.
बरं याचा अर्थ एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तींनी लग्न करु नये असा होत असेल तर ते योग्य नाही. ते सुद्धा लग्न करु शकतात.. म्हणजे नवरा -बायको दोघे जरी पॉझिटीव्ह असले तरी ते एचआयव्ही निगेटीव्ह बाळाला जन्म देवू शकतात.मग त्यांचं वैवाहिक जीवन त्यांना उपभोगू न देणं गैर ठरेल.
पण स्वतःच पॉझिटीव्ह स्टेटस लपवून दुसर्‍यास फसवणं निश्चित चूक आहे..... दुर्दैवानं त्यासाठी कायदा अस्तित्वात नाही,कायदा होवू शकत नाही.
सरते शेवटी इतकंच म्हणेन की,आपल्या देशात कायदा तितक्या पळवाटा आहेत. प्रत्येक वाहनाला पीयुसी प्रमाणपत्र अनिवार्य आहे...... पण ते कश्या पद्धतीने मिळतं हे सांगायची गरज नाही. एचआयव्ही निगेटीव्ह प्रमाणपत्र सुद्धा असंच कशावरुन मिळणार नाही?
एचआयव्ही नियंत्रण कार्यक्रमाविषयी आणखी माहिती इथे मिळेल.
www.nacoonline.org
www.avert.org
अजून माहिती हवी असेल... एचआयव्ही नियंत्रण कार्यक्रमाविषयी,तर माझ्याशी  maitrajivanche.ngo@gmail.com  या विरोपपत्त्यावर संपर्क करा. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर या विभागापुरता हा पूर्ण कार्यक्रम माझ्या कडून राबविला जातो.

संबंधित वेबसाईट

http://mahasacs.org/48%20NGO%20MARATHI%20LIST.pdf

या इथे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेसोबत काम करणार्‍या अशासकीय संस्थांची यादि. यात या संस्थांचे पत्ते,फोन्,फॅक्स इ.इ. सगळं काही आहे.
मोफत समुपदेशन व चचणी केंद्रे महाराष्ट्रात सर्वत्र आहेत.उदा.ठाणे जिल्ह्यात असलेल्या केंद्रांची यादि खालील प्रमाणे.
LIST OF ICTC CENTRES ( THANE)

Mahatma Gandhi Missions Med. College, Navi Mumbai
Padmashree Dr. D.Y.Patil Med. Col., Navi Mumbai
Terna Medical College, Navi Mumbai
Rajiv Gandhi Medical College, Thane
Civil Hospital, Thane
Civil Hospital, Thane
Corporation Hospital, Vashi, New Mumbai
Central Hospital, Ulhasnagar
Kalyan Dombivali Corp. Hospital
SDH, Wada
SDH, Dahanu cottage
SDH, Kasa (RH)
SDH, Manor
SDH, Virar
SDH, Murbad
SDH,Palghar
SDH, Mokhada
Indira Gandhi Hospital, Bhiwandi
General Hospital, Sector 10, Navi Mumbai
Rukhminibai Hospital, Kalyan.
SDH,Talasari
SDH,Vikramgad
SDH,Goveli
Ulhasnagar Maternity Home, Camp 4, Ulhasnagar
Airoli MCH, Navi Mumbai
Nerul MCH, Navi Mumbai
Turbhe MCH, Navi Mumbai
Sutikagriha Hospital, Tilak Path, Dombivali (W), Kalyan
Vartak Nagar Mat. Home, Thane
Health Centre, Miraroad
S.Meenathai Thakare Mat. Home, Mumbra, Thane
Health Centre, Bhayender
Mahatma Phule, Kalyan
Balkum Mat. Home, Thane
SDH, Shahapur
RH, Jawahar
महारा ष्ट्रातील सर्व केंद्रांची यादि इथे मिळेल.
http://mahasacs.org/INNER1.HTM
एच.आय.व्ही.टेस्ट आणि प्रसाराबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती इथे मिळेल.
http://www.hivtest.org/
http://www.thebody.com/testing.html

डॉ. कैलास गायकवाड
मुख्य वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई.

No comments:


"सामाजिक संस्था म्हणजे समाजाची, समाजाच्या हितासाठी काम करणारी संस्था. आपण फक्त त्या समाजाचे प्रतिनिधी म्हणुन काम करत असतो. आपले काम कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता करत राहणे एवढेच आपले कर्तव्य."

कृपया नोंद घ्यावी की ब्लॉगवर देण्यात आलेल्या माहिती आणि माहितीविषयक बाह्य दुव्यांवरील माहितीच्या वैधतेबद्दल "मैत्र जिवांचे सामाजिक संस्था, मालखेड, जि. सातारा" कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही. या माहितीवर अंमल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा होवू शकणार्या कुठल्याही परिणामाला संस्था जबाबदार राहणार नाही. आपली इच्छा असल्यास संस्थेचे डॉक्टर्स आपल्याला हवी ती सर्व माहिती विनामुल्य अथवा अतिशय वाजवी दरात (जर बाहेरील डॉक्टरचे नाव सुचवले तर) पुरवू शकतील. इच्छुकांनी कृपया maitrajivanche.ngo@gmail.com या विरोप पत्त्यावर संपर्क साधावा.

"मैत्र जिवांचे सामाजिक संस्था", मु.पो. मालखेड, ता. कराड, जि. सातारा.