Subscribe:

Ads 468x60px

.

Monday 19 September 2011

लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही...

आम्ही काही मायबोलीकर मित्रांनी एकत्र येवून केवळ गप्पा-टप्पा न करता काहीतरी विधायक कार्याला हात घालायचा असे ठरवले.
जिथून या नव्या पर्वाची सुरुवात झाली तो हा टप्पा ! मायबोलीकर ह बा उर्फ़ श्री. हणमंत शिंदे यांनी एक धागा टाकला मायबोलीकरांची मते आजमावण्यासाठी आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तो मुळ विचार मायबोलीकरांच्या मते आणि सल्ल्यांसहीत...

*************************************************************************************

एका लेखावरील चर्चेच्या ओघात समाजसेवेचा विषय निघाला बर्‍याच लोकांची काम करण्याची इच्छा असते पण मार्ग मिळत नाही. नेमके काय करावे ते ठरवता येत नाही. मी माझ्या 'कबिला' या त्रैमासिकाच्या मुखपृष्ठावरच एक संकल्पना मांडाली होती.
"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय मुलगा मुलगी दोघांच्या एचआयव्ही एड्सच्या चाचणीनंतरच घेण्यात यावा. लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही तपासणी अहवाल सादर केल्याशिवाय त्या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देऊ नये. तसा कायदा करावा"

याविषयी सर्वांची मते जाणून घ्यायला आवडेल.

यामुळे बराच फायदा होईल. एड्सला आळा बसण्यास मदत होईल व दोघेही विश्वासाने सुरक्षीत जीवन जगतील.
कुणाला काम करायची इच्छा असेल तर नक्की संपर्क साधा. माबोच्या सहाय्याने एड्स, आरोग्य, व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारी नवी एनजीओच सुरू करुयात.
*************************************************
एचआयव्ही तपासणी केंद्रे व त्यांचे संपर्क. या रोगासंदर्भाने कोणतीही शास्त्रीय माहिती. मार्गदर्शक ठरतील अशा संस्था व त्यांचे संपर्क. एकुणच या विषयाच्या संबंधित कोणतीही माहिती वा मार्गदर्शन इथे जरूर द्यावे हि नम्र विनंती.

***********************************************************************************

मायबोलीकरांची मते आणि सल्ला


अश्विनी के | 8 December, 2010 - 14:50
सध्याच्या काळात अगदी योग्य विचार. पण HIV टेस्ट रिपोर्ट हा फार कमी वेळासाठी वॅलिड असतो. त्यामुळे लग्नाच्या तारखेच्या जस्ट आधीचा रिपोर्ट घेतला पाहिजे. त्याच बरोबर वधु व वराकडल्यांनी हा अपमान वगैरे मानून घेऊ नये.
काळ बदलला आहे. आता विवाह बाह्य संबंध, विवाह पूर्व संबंध, लिव्ह इन रिलेशन्शिप्स ह्या गोष्टी निषिद्ध राहिल्या नाहियेत. पुर्वीही होत्या पण समाजाची भीड आणि स्वतःच्या मनाची लाज हा प्रकार जास्त प्रमाणात अस्तित्वात होता. आता समाजाशी काही देणंघेणं नसतंच आणि ही गोष्ट लाजिरवाणी वाटणं कमी झालं आहे, उलट पुरस्कारच होतो आहे. असुरक्षित आणि एकापेक्षा अनेकांशी संबंध येणे हे मुख्य कारण आहे.
मध्यंतरी लिलावतीमध्ये एका नातेवाईकाला बघायला गेले होते. तिथे एक ब्रेनमधे इन्फेक्शन झालेला दुसरा पेशंट सिरियस होता. त्याची बायको दिवस रात्र त्याच्या सेवेत होती. मुलांची १०वी वगैरेची महत्वाची परिक्षा चालू होती. त्या माणसाने बायकोशी नियमित प्रतारणा केलेली होती आणि त्याला HIV जडला होता. इम्युनिटी कमी असल्याने मेनेंजायटीस, टीबी वगैरेही झाला होता. तीच प्रतारणा केली गेलेली बायको नक्की कुठल्या मनस्थितीत त्याची सेवा करत होती कुणास ठाऊक?
रक्तदानाच्या बहुतेक फॉर्म्सवर लिहिलेलं असतं की काही अ‍ॅबनॉर्मल रिपोर्ट्स आल्यास दिलेल्या पत्त्यावर्/इमेल अ‍ॅड्रेसवर्/फोनवर कळवातेत्/कळवू नये. आपण 'कळवावेत' असं टिक केलं आणि काही अ‍ॅबनॉर्मल निघालं तर कळवत असतील. मी जेव्हा जेव्हा रक्तदान केलंय तेव्हा कळवायला सांगितलं होतं पण अजून एकदाही काही कळवलं गेलं नाही म्हणजे सगळं नॉर्मल आहे असं समजून चालायचं.
रक्त एच आयव्ही दूषीत आहे किंवा नाही याची चाचणी प्रत्येक रक्तपेढीने केलेली असते.... पण ही चाचणी ( एलायझा) एच आय व्हीची लागण झाल्यावर ३ ते सहा महिन्यात पॉझिटीव येते.... जर रक्तदान ह्या विंडो पिरियड मध्ये केलेले असले तर रक्त दूषीत असून सुद्धा चाचणी निगेटीव्ह येते.. व हे रक्त स्वीकारलेला काहीही चूक नसताना एच आय व्ही पॉझिटीव्ह बनतो. >>>
डॉ., या परिस्थितीत काय करायला हवे?  ते रक्तपेढीतील रक्त ६ महिने प्रिझर्व केले तर नंतर त्याची चाचणी करता येते का? म्हणजे तो पिरियड घालवला तर ती टेस्ट जास्त बरोबर येईल.
फंगस किंवा बॅक्टेरिया जसे ब्लड अगार मधे आपण वाढवू शकतो अभ्यास करण्यासाठी तसा व्हायरसही मल्टीप्लाय होत असेल का? अँटीबॉडीज नाही तयार होणार पण ६ महिन्यांदरम्यान व्हायरसची क्वांटिटी जास्त झाल्यास डिटेक्ट करता येईल का?


विषय चांगला आहे.... पण या विषयाचा आवाका फार मोठा आहे.
लग्ना आधी ही चाचणी करावी की नाही हा स्वेच्छेचा प्रश्न झाला. मुळात ही चाचणीच ऐच्छिक आहे. म्हणून ही चाचणी मोफत करण्यात येणार्‍या केंद्रास व्हीसीटीसी सेंटर ( व्हॉलुंटरी टेस्टींग अँड काउन्सेलिंग सेंटर ) असं म्हटलं जातं. पीसीआर ( पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन ) ने बिनचूक निदान होते व त्यात इन्फेक्शन विंडो पीरीयड मधे असलं तरी कळू शकतं ..म्हणजे टेस्ट तरीही पॉझिटिव्ह येते.
बरं याचा अर्थ एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तींनी लग्न करु नये असा होत असेल तर ते योग्य नाही. ते सुद्धा लग्न करु शकतात.. म्हणजे नवरा -बायको दोघे जरी पॉझिटीव्ह असले तरी ते एचआयव्ही निगेटीव्ह बाळाला जन्म देवू शकतात.मग त्यांचं वैवाहिक जीवन त्यांना उपभोगू न देणं गैर ठरेल.
पण स्वतःच पॉझिटीव्ह स्टेटस लपवून दुसर्‍यास फसवणं निश्चित चूक आहे..... दुर्दैवानं त्यासाठी कायदा अस्तित्वात नाही,कायदा होवू शकत नाही.
सरते शेवटी इतकंच म्हणेन की,आपल्या देशात कायदा तितक्या पळवाटा आहेत. प्रत्येक वाहनाला पीयुसी प्रमाणपत्र अनिवार्य आहे...... पण ते कश्या पद्धतीने मिळतं हे सांगायची गरज नाही. एचआयव्ही निगेटीव्ह प्रमाणपत्र सुद्धा असंच कशावरुन मिळणार नाही?
एचआयव्ही नियंत्रण कार्यक्रमाविषयी आणखी माहिती इथे मिळेल.
www.nacoonline.org
www.avert.org
अजून माहिती हवी असेल... एचआयव्ही नियंत्रण कार्यक्रमाविषयी,तर मला विपूतून संपर्क करा...... नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर या विभागापुरता हा पूर्ण कार्यक्रम माझ्या कडून राबविला जातो.

<<<<<कित्येकांना दूषित रक्त चढवून घेतल्याने मिळालेला असतो. किमान इस्पितळे तरी रक्त चढवताना इतकी मूलभूत काळजी घेत नाहीत? >>>
रक्त एच आयव्ही दूषीत आहे किंवा नाही याची चाचणी प्रत्येक रक्तपेढीने केलेली असते.... पण ही चाचणी ( एलायझा) एच आय व्हीची लागण झाल्यावर ३ ते सहा महिन्यात पॉझिटीव येते.... जर रक्तदान ह्या विंडो पिरियड मध्ये केलेले असले तर रक्त दूषीत असून सुद्धा चाचणी निगेटीव्ह येते.. व हे रक्त स्वीकारलेला काहीही चूक नसताना एच आय व्ही पॉझिटीव्ह बनतो. अरेरे
डॉक्टर, रक्तदान करताना (करायच्या आधी) काय खबरदारी घ्यावी? आपण जाणकार असल्याने, तेही लिहिले तर अधिक चांगले...नाहीतर सदहेतुने रक्तदानाला जायचे आणि आपल्यालाच काहीतरी व्हायचे
वेल... रक्तदाता रक्तदान करणेस योग्य की अयोग्य हे रक्तपेढीचे तंत्र ज्ञ व डॉक्टर ठरवतातच... आणि अश्या सुयोग्य रक्तदात्यास रक्तदानाने काहीही तोटा होत नाही......
डॉ., या परिस्थितीत काय करायला हवे? एक बावळट, मूर्ख, अडाणी प्रश्न विचारते---- ते रक्तपेढीतील रक्त ६ महिने प्रिझर्व केले तर नंतर त्याची चाचणी करता येते का? म्हणजे तो पिरियड घालवला तर ती टेस्ट जास्त बरोबर येईल.
अश्विनी..... ३ ते सहा महिन्यांनी पॉझिटीव्ह माणसाच्या शरीरात एच आय व्ही अँटीबॉडीज तयार होतात ज्या एलायझा टेस्टने डीटेक्ट होतात.... आत्ता घेतलेले रक्त सहा महिन्यांनी सुद्धा निगेटीव्हच येईल.
गौतमा.... ५० किलो वजनाचा निरोगी,व अ‍ॅनिमिक नसलेला कुणीही रक्तदान करू शकतो.... वय ५० च्या आत हवे.

अतिशय योग्य विचार. सुशिक्षित तरी योग्य खबरदारी घेतीलच पण कायदा केला तर अशिक्षितांमधे सुद्धा ह्या विषयाबद्दलची जागरूकता येईल.
HIV infection झाल्यानंतर तो लगेच डिटेक्ट होत नाही.. त्यासाठी किमान ३-६ महिन्यांचा window period (provided there is no HIV incidence in this period) द्यावा लागतो..लग्नाच्या तारखेच्या आधीचा रिपोर्ट घेऊन फारसा फायदा होणार नाही
HIV टेस्ट रिपोर्ट हा फार कमी वेळासाठी वॅलिड असतो. त्यामुळे लग्नाच्या तारखेच्या जस्ट आधीचा रिपोर्ट घेतला पाहिजे
>>>>>>>>>>>
ही दोन परस्पर विरोधी विधानं आहेत. जर तो रिपोर्ट कमी वेळासाठी वॅलिड असेल तर ३-६ महिन्याच्या आधीचा रिपोर्ट घेण्याइतपत वेळ असतो का? काही लग्न अगदी झट मंगनी पट ब्याह तत्त्वावर होतात.. काही काही लग्न नवरामुलगा अगदी एका आठवड्यासाठी भारतात येणार आहे तेवढ्यात लग्न उरकून घेऊ अशी असतात.. मग हे कसं जमायचं? अश्या अनेक केसेस आहेत जिथे ३-६ महिन्यांचा काळ नसतो... अश्यांसाठी काही उपाय आहे का?

HIV infection झाल्यानंतर तो लगेच डिटेक्ट होत नाही.. त्यासाठी किमान ३-६ महिन्यांचा window period (provided there is no HIV incidence in this period) द्यावा लागतो... आणि त्यानंतर केलेल्या टेस्टचे रिझल्ट्स निगेटिव्ह आले तरच HIV infection झाले नाहिये असं म्हणता येते..
परंतु या बाबतीत ethics चा प्रश्न येतो... रुग्णाच्या परवानगी शिवाय टेस्टचे रिझल्ट्स कोनालाही सांगितले जात नाहित सध्यातरी....
हो टेस्ट दोनदा करावी लागेल. (विंडो पिरियड लक्षात घेऊन.) आणि दुसर्‍या टेस्ट नंतर ती व्यक्ती कायम नजरेखाली ठेवावी लागेल.>>> पहिल्या टेस्टनंतरपासुनच ती व्यक्ती (दोन्ही व्यक्ती, मुलगा आणि मुलगी) नजरेखाली ठेवावे लागतील
ते सर्टीफिकेटही कितपत विश्वासार्ह आहे, ते बघावे लागेल.>>> सध्यातरी HIV test चे reports काहीही फेरफार न करता मिळत आहेत... पण जर हे बंधनकारक केलं गेलं तर मात्र त्यात फेरफार होवु लागतील
अश्या वेळेस false negative ची शक्यता जास्त असते (म्हणजे HIV infected असतानाही टेस्ट निगेटिव्ह येने).. १/२ तासात HIV psitive/negative कळु शकेल अश्याही टेस्ट आहेत, पण या confirmatory tests नसतात..
टेस्ट positive येते म्हणजे hiv infection नंतर ज्या antibody शरीरात तयार होतात त्या डिटेक्ट केल्या जातात.. या antibody तयार व्हायलाच ३-६ महिने लागतात.. म्हणुनच window period महत्वाचा असतो..

तश्या शंका बर्‍याच असतात हो पण शेकडो चुकिच्या रिपोर्ट मधे एखादा बरोबर दिला जाईलच की त्यातही आपल्या कामाचं समाधान मिळेल. तुमच्या मतांचं स्वागत आहे पण मला कामाच्या आधी अडचणींची चर्चा........>>>> काम चालु करायच्या आधीच काय काय अडचणी येवु शकतात आणि त्या दुर करायला काय करता येइल यावर आधीच विचार केलेला बरा.... अशी संस्था चालु करायची असेल तर १००मधे एखादा बरोबर रिपोर्ट हा रेशो योग्य नसुन १००मधे एखादाच चुकिचा रिपोर्ट असाच रेशो असायला हवा... सध्यातरी या बाबतीत्ल अडचण येनार नाही...
झट मंगनी वाल्यांचे काय करणार ???? >>> अश्यांकरता PCR टेस्ट वापरता येइल.. यात व्हायरस चा जिनोम डिटेक्ट केला जातो.. पण कदाचीत यातही १-२ आठवड्यांचा काळ असा असतो की त्यामधे hiv infection असुनही टेस्ट निगेटिव्ह येवु शकते (मला नीट आठवत नाहिये याबाबतीत)
त्या क्षणी ज्याना असा अजार आहे. त्यांच्या नियोजीत वर्/वधुचं तरी कल्याण होईल ना?>>>> १००% सहमत...
शहरी भागात ह्याची गरज बिंबवणे आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळवणे(प्रत्यक्ष सहभागा बाबतीत) फारसे कठीण होऊ नये >>>> शहरी भागातही याबाबतीत प्रचंड कठीण आहे..

जर recent इन्फेक्शन असेल तर PCR टेस्ट पॉसिटिव्ह येते... जर ELISA (यात HIV antibody डिटेक्ट करतात) negative आली तर परत ३ महिन्याने टेस्ट करावी लागते.. आणि दुसरी टेस्टही निगेटिव्ह आली आणि मधल्या काळात HIV शी संबंध आला नसेल तरच ती व्यक्ती HIV निगेटिव्ह आहे असं म्हणता येईल..
वहायच्या आधी वळणे कशी आहेत याचा जो अंदाज येईल त्यापेक्षा वाहता वाहता अनुभवाने पक्का रस्ता सापडेल.>>>> तसं नको.. सुरुवातीपासुनच जेव्हडे जमतील तेव्हडे प्रॉब्लेम्स माहित असलेले बरे.. कारण प्रत्यक्ष काम करताना कधिही विचार केले नसतील असे प्रॉब्लेम्स समोर येतात..


अजुन एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, काही वेळा निरोगी लोक HIV vaccine च्या clinical trial साठी volunteer असतात.. अश्यावेळेस अश्या व्यक्तींची टेस्ट HIV infection नसतानाही पॉसिटिव्ह येते ...

व्हायरस म्हणजे अँटीजन फक्त पी.सी.आर.टेस्टने डेमॉन्स्ट्रेट करता येतो.>>> व्हायरस चा जिनोम पी.सी.आर टेस्ट ने डिटेक्ट करता येतो.. अँटीजेन म्हणजे व्हायरल प्रोटिन्स (e.g.p24), हे एलायझा ने टेस्ट करता येतात.. पण या दोन्ही टेस्ट खूप महाग असतात म्हणुन वापरत नाहीत..


त्याच बरोबर वधु व वराकडल्यांनी हा अपमान वगैरे मानून घेऊ नये.>>> त्याना तो अपमान वाटू नये इतपत त्याची योग्यता बिंबवणे हेच तर आपल्यासारख्यांचे काम आहे.
१) मिळणार सर्टिफिकेट तरी बरोबर असेल का? आजकाल भ्रष्टाचार इतका बोकाळलाय की पॉझेटिवला निगेटिव करणे खुप अवघड नाही.
२)लग्नापुर्वी नेगेटीव असणारा माणुस (स्त्री/पुरुष) लग्नानंतर पॉझेटिव होणार नाही कशावरुन??
>>>> या गोष्टींची खबरदारी घेण्यासाठीच एका विश्वसणीय मध्यस्थाची आवश्यकता आहे. कुणीही स्वतःहून हे करुया म्हणनार नाही पण मध्यस्त असेल तर गोष्टी सोप्या होतील. लग्नाळूंना पुर्वकल्पना दिली जाऊ शकते. लग्न ठरते आहे हे समजताच कामाला सुरूवात होईल. शेजार्‍यांना सांगा, पाहुण्यांना सांगा, कंपनीत सांगा. तुम्ही बोलून पहा लोक हे स्विकारतील फक्त कुणीतरी सांगणारा हवा. समजाऊन देणारा हवा. 

अश्या अनेक केसेस आहेत जिथे ३-६ महिन्यांचा काळ नसतो... अश्यांसाठी काही उपाय आहे का?
>>> पुढच्या वर्षी लग्न करायचे आहे हे तर माहिती असतेच ना. त्या दरम्यान ठराविक कालावधीत तपासणी करा.
आणि हे जरी शक्य नसलं आणि बर्‍याच अडचणी असल्या तरी त्या क्षणी ज्याना असा अजार आहे. त्यांच्या नियोजीत वर्/वधुचं तरी कल्याण होईल ना?

असा कायदा करायला पुढचे शतक उजाडेल.>>> येत्या विस वर्षाच्या आत हे होईल. ही भविष्यवाणी नव्हे लोकांचे बदलते विचार आणि एकुण जीवनमान बघता अगदी विश्वासाने असे म्हणता येईल. हा माझा विश्वास आहे.

तिथे एच. आय. व्ही. विषयी अशा प्रकारची जागरूकता आणणे प्रचंड आव्हानात्मक ठरावे परंतु अवघड नक्कीच नाही.... >>> येस विजयदा. अवघड नाही. आपल्यासारख्या अनुभवी मेंदूचा वापरच पुरेसा आहे. सगळ्याच मायबापाना वाटतय की पोरीचं/पोराच कल्याण व्हावं पण तोंड उघडायचं कुणी हा सवाल आहे त्याचा जवाब देणारे माबोकर त्याना भेटले की झालं... यकदम सोप्प आहे....

अशी संस्था चालु करायची असेल तर १००मधे एखादा बरोबर रिपोर्ट हा रेशो योग्य नसुन १००मधे एखादाच चुकिचा रिपोर्ट असाच रेशो असायला हवा... >>> अर्थात तो रेशो तसाच रहावा म्हणून आपण सजग राहू.
त्या दुर करायला काय करता येइल यावर आधीच विचार केलेला बरा....>>> नक्कीच, पण मला इतकेच म्हणायचे आहे की वहायच्या आधी वळणे कशी आहेत याचा जो अंदाज येईल त्यापेक्षा वाहता वाहता अनुभवाने पक्का रस्ता सापडेल.

ओके चिमुरी,
तुम्हाला ज्या अडचणी येतील असे वाटते आहे त्या तुम्ही सलग मांडा. मांडताना हे लक्षात ठेवा की
आपण लोकांना १. लग्नापुर्वी ही तपासणी किती व का महत्वाची आहे २. तपासणीची शास्त्रीय माहिती ३. ती तपासणी उपलब्ध असणारी ठिकाणे व खर्च ४. आजार होण्याची कारणे व अशा आजारापासून दूर राहण्याचे मार्ग इ. माहिती पुरविणार आहोत. आपले महत्वाचे काम असेल लोकांची मानसिकता बदलून एक प्रथा म्हणून ही तपासणी विवाहसंस्थेत रुजविणे. त्यासाठी आपल्याला गरज आहे ज्ञानाची, तज्ञांची, आपल्या संभाषण कौशल्याची आणि काम करण्याच्या बिनशर्त, निस्वार्थ तयारीची.

इथल्या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या... विचार चांगला आहे.
मला एक शंका आहे, समजा ठरल्याप्रमाणे दोन्ही बाजूंची एच आय व्ही टेस्ट करून घेतली... मुलगी किंवा मुलगा एकाची पॉझिटिव्ह आली, लग्नं मोडलं, तर दुसर्‍या बाजूच्या मंडळींकडून सिक्रसी मेंटेन करण्याची गॅरेंटी कोण घेऊ शकेल? त्यासाठी काही कायदा सुव्यवस्था? तो ज्याच्या त्याच्या मॅच्यूरिटीचा प्रश्न आहे हे खरं... पण समाजात शाब्दिक आग लावणारे लोक कमी नसतात. आधीच एच आय व्ही डिटेक्ट झाला म्हणून अर्धमेली झालेली माणसं, बदनामीमुळे अजून दबली जाऊन सामुहिक आत्महत्या पण करू शकतील..

हबा माझा प्रश्न वेगळाच आहे... मी सिक्रसी मेंटेन करण्याविषयी विचारलंय..
मानसिक आधार तर प्रत्येक जण आपापल्या परिने मिळवेलंच...


आधीच एच आय व्ही डिटेक्ट झाला म्हणून अर्धमेली झालेली माणसं, बदनामीमुळे अजून दबली जाऊन सामुहिक आत्महत्या पण करू शकतील..
>>> कदाचित नाहित पण करणार, शक्यतांवर विसंबून चालणार नाही. एचआयव्ही पॉसिटीव्ह आहे यात दोष किंवा अनावधान त्या व्यक्तिचे आहे. त्याने व त्याच्या कुटूंबाने ही गोष्ट मान्य करायला हवी. वर जेव्हा हे एका संस्थेच्या माध्यमातून समोर येईल तेव्हा ती संस्था त्याना मानसिक आधार शास्त्रीय माहिती व पुढचे मार्गदर्शन करेलच. पण जर ते सामुहिक आत्महत्या करू शकतात म्हणून तपासणीच टाळली तर निर्दोष मुलिचा/मुलाचा खून होईल त्याचं काय? त्याच मुलाने ही गोष्ट दडवून आपल्याच नातेवाईकातली मुलगी पाहिली व ही गोष्ट आपल्याला कळाली तर तीला वाचविणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याला एड्स झाला हा त्याचा दोष असेल किंवा नसेलही पण जर त्याने कळाल्यानंतरही लग्नाचा विचार केला तर तो गुन्हा/घात आहे.

मी सिक्रसी मेंटेन करण्याविषयी विचारलंय..
>>> ती मेंटेन करणं ज्या वेळी कुणाच्यातरी जीवासाठी धोकादायक ठरेल तेव्हा ती करू नये. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे उगाच बदनामी करत फिरणार्‍यांना एड्सच लागतो असे नाही. निर्व्यसनी मुलाला अट्टल दारूडा घोषित केले जाते. बालब्रह्मचार्‍याची दहाबारा लफडी रसभरीत वर्णन करून सांगितली जातात. हे प्रकार आहेतच पण समाजाच्या व्यापक फायद्यासमोर अशा गोष्टींचा विचार करणे अयोग्यच ठरावे असे वाटते.
तरीही तुम्ही विचारताय म्हणजे अशा गोष्टींवर काही उपाय / पर्याय तुमच्याकडे असेलच तो मांडलात तर अधिक बरे होईल.

हबा,
संपुर्ण पाठींबा या विचाराला. फक्त एकच वाटते की याबाबतीत आधी जनजागृती(विशेषतः ग्रामीण भागात) आणि इन्फ्रास्ट्रक्चर विशेषतः नि:स्पृह/त्रयस्थ तपासणी केंद्र हे आधी व्हायला हवे. (जर तिथेही काँप्रोमाईझ्ड रीपोर्ट्स मिळणार असतील तर मात्र हे नुसते रद्दीभरणे होईल).


शुभांगी हेमंत | 8 December, 2010 - 14:53
अतिशय चांगली कल्पना आहे. एच आय व्ही बद्दल जनजागृती आपण कितीवेळा ऐकतो. पण खरच सगळ्या गोष्टी अमलात येतातच अस नाही. पण स्वतःपासुन सुरवात या अनुशंगाने खरच लग्नापुर्वी एच आय व्ही टेस्ट बंधनकारक करावी. कित्येक निष्पाप जीव वाचतिल यामुळे.
पण परत पुढचे प्रश्न आहेतच
१) मिळणार सर्टिफिकेट तरी बरोबर असेल का? आजकाल भ्रष्टाचार इतका बोकाळलाय की पॉझेटिवला निगेटिव करणे खुप अवघड नाही.
२)लग्नापुर्वी नेगेटीव असणारा माणुस (स्त्री/पुरुष) लग्नानंतर पॉझेटिव होणार नाही कशावरुन??
पण हे ही नसे थोडके या उक्तीवरुन ही टेस्ट बंधनकारक करावी हे माझ मत.




टेस्ट करुन घेणे आवश्यक आहे असे मलाही वाटते पण वर चिमुरीने लिहिलेय ते मीही ब-याच ठिकाणी वाचलेय. त्यामुळे लग्नाच्या तारखेच्या आधीचा रिपोर्ट घेऊन फारसा फायदा होणार नाही असे वाटते.
provided there is no HIV incidence in this period हे महत्वाचे आहे पण याची खात्री कोण देणार?

चांगला विचार आहे. आपण 'विवाह सुचक मंडळांना' सुचवु शकतो की मुला-मुलिंची नाव नोंदणी करुन घेतानाच HIV Test Report बंधनकारक करावा आणि लग्न जमत असेल तर पुन्हा एकदा Test करायला सांगावी. तसेच लग्न अजुन जमले नाहिये पण सुरुवातिला दिलेल्या report ची validity संपली असेल तर पुन्हा report submit केल्याशिवाय त्यांना पुढे कुठल्या मुला/मुलिंची माहिती / संपर्क देवु नये.
खेड्यात माहिती नाही पण शहरात तरी याचा काही फायद होऊ शकतो कारण शहरातही आपल्यासारखे सुशिक्शित सुद्धा HIV Test बद्दल अजुन तेवढे जागरुक नाहियेत.......... जागरुकता चर्चा करण्यापुर्तीच आहे.

शहरी भागात ह्याची गरज बिंबवणे आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळवणे(प्रत्यक्ष सहभागा बाबतीत) फारसे कठीण होऊ नये >> माझी एक अत्यंत जवळची मुंबईत वाढलेली मैत्रिण लग्नासाठी मुलं बघत होती.. तिला विचारलं की तुला एखादा मुलगा लग्नायोग्य वाटला तर त्याला असं सर्टिफिकेट मागशील का.. ती म्हणाली की तिला असं वाटत नाही की कुठला मुलगा हे अ‍ॅक्सेप्ट करेल..
समोरच्याच्या इगोकरता आख्खं आयुष्य पणाला लावणं मला तरी बरोबर वाटलं नाही! मी समजवण्याचा प्रयत्न केला .. पण तिला लॉजिकली ते पटलं तरी she was not ready to go ahead with that. अरेरे
त्यामुळे कायदा आला तरच बदल शक्य होईल (हळूहळू का होईना)
डेलिया, तू म्हणतेस ती माणसं "मॅच्युअर" कॅटेगरीतली असतात. माहित असूनही फसवणारेच जास्त सापडतील.
विवाहसूचक मंडळाचा उपाय चांगला वाटतो - पण तो बिझनेस असल्यानं येणार्‍या उपवर लोकांनीही मान्य केलं तरच हे रुजलं जाण्याची शक्यता जास्त. कायदा हाच उत्तम उपाय.. काहीजण पळवाटा शोधतीलही.. पण काही जण वाचू शकतील.. जितका जास्त काळ जाईल तितका हा विचार समाजात रुजेल..
बरोबर, पण ते वाक्य मी दक्षिणाच्या पेशंटच्या 'सिक्रसी' च्या मुद्याला उद्देशुन लिहिले होते. पण अशाच फसवू पहाणार्‍या किन्वा बेपर्वा लोकांच्या सिक्रसी ची चिंता समाजानी किन्वा दुसर्‍या पार्टी नी कशाला का करावी आणि आपल जीव धोक्यात टाकावा नाही का. >> आपला मुद्दा सारखाच आहे म्हणजे!
हे बहुतेक सगळ्यांच्याच बाबतीत होते. इथे 'टेस्ट हवी' लिहीणार्‍यांपैकी तरी कोणी टेस्ट केलीये का लग्नाआधी ?
>> आम्ही लग्न करायचं असं कॉलेजच्या दिवसात ठरवलेलं.. ठरवलं तेव्हा HIV बद्दल काहीच जागरूकता नव्हती.. शब्दही ऐकला असेल जेमतेम. त्यामुळे तसा काही प्रश्नच नव्हता! (आणि हबांच्या मैत्रिणीचं उदाहरणच बघ ना.. तिनं केली नव्हती टेस्ट लग्नाआधी - पण म्हणून तिनं लोकांना सांगायचं नाही का? इन फॅक्ट तिला त्याचे परिणाम चांगलेच माहिती आहेत, त्यामुळे ती जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकते!)
आज इतकी जागृती झालेली असताना, अशा केसेस माहित असताना केवळ समाजाच्या भितीनं तसं पाऊल न उचलणं पटत नाही..
प्रत्येक घटना फसवणुक नसणार आहे, त्यामुळे समाजाने सिक्रेसीची, सहानभुतीची तसेच आधाराची चिंता जरुर करायला हवी असे वाटते. >> ह्या बाबतीत वेगळ्या पातळीवर जनजागृती होणं गरजेचं आहे..
आमच्या पुण्यातल्या कामवाल्या बाईचा नवरा एडस नं गेला हे सोसायटीत पसरलं आणि बर्‍याच जणांनी तिला कामावरून काढून टाकलं. असं सरसकट वाळीत टाकणं अगदीच बरोबर नाही.. आधीच ती व्यक्ती मानसिक/शारिरीक/आर्थिक रित्या खचलेली असू शकते - त्यात पुन्हा असं बाकीच्यांनी वागणं अगदीच चूक.. व्याभिचारामुळे HIV होतो हाच तर मोठा गैरसमज आहे >> मुळात कुठल्याही कारणामुळे रोग झाला तर वाळीत टाकणं बरोबर नाही.. हा तर संसर्गजन्य रोगही नाहीये की सहज स्पर्शातून, श्वासातून होईल..समाजाच्या कुष्ठरोगाचं आधुनिक रूप झालं हे!
पण HIV ग्रस्त/एडसग्रस्त लोकांशी समाजाची वागणूक आणि लग्नाआधी HIV positive असून आणि हे माहित असून दुसर्‍या व्यक्तीला मृत्यूच्या दारात पाठवणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माहित असूनही फसवणूक करणारे महाभाग कमी नाहीत - हे होऊ नयेत म्हणून कायदा होणं गरजेचं.
(HIV ग्रस्त/एडसग्रस्त लोकांशी समाजाची वागणूकीकरता जनजागृतीची गरज आहे- हे अगदी मान्य! )
किमान इस्पितळे तरी रक्त चढवताना इतकी मूलभूत काळजी घेत नाहीत
>> जर लोकं पैशाकरता शवागारातला बर्फ गुर्‍हाळात विकू शकतात, जखमांवरचा कापूस ब्लीच करून कान साफ करायचे बड्स करू शकतात, तर सेम लोक पैशाकरता/हलगर्जीपणानं काहीही करू शकतील असं वाटतं (करत असतीलच असं नाही.. पण शंका/भीती वाटतेच!)
असा कायदा व्हावा असे मनापासुन वाटते.
दक्षिणाचे म्हणणे ही पटले. म्हणुनच लग्नाला उभे रहाण्यापुर्वीच जर मुला मुलींनी स्वतःची टेस्ट करुन घेतली तर अशी बेइज्जती टळू शकेल. नाहीतर लग्न ठरल्यावर टेस्ट करुन ती पॉझिटीव्ह आल्यास ते सगळीकडे पसरणारच. अर्थात पण कोणाची तरी सीक्रसी जपण्यासाठी दुसर्‍या निरपराध माणसाचा जीव धोक्यात जात असेल तर त्या सीक्रसीची चिंता करणे मलातरी मुर्खपणाचे वाटते.
कायद्यातुन पळवाटा काढणारे , तो न मानताच पुढे जाणारे खुप लोक असतील परंतु त्या आधाराने एका व्यक्तीचा जरी जीव वाचु शकला तरी त्या कायद्याचे सार्थक होईल.
अता लग्नाचे किमान वय, हुन्डाबंदी असे कायदे आहेतच की आणि ते तोडणारे पण आहेत. तरीही त्या कायद्यांचा कुठेनाकुठे थोडाफार फायदा होतोच आहे.
तसेच HIV चा पण कायदा झाल्यास हळू हळू का होईना पण फायदाच होईल. शिवाय अत्ता मनात असुन सुद्धा या विषयावर बोलणे, असा आग्रह धरणे मुला किन्वा मुलीकडच्यांना अवघड वाटू शकते. तेव्हा कायदा झाला तर ते सोप्पे होईल.
अता इथे मायबोलीवर लिहिणारे सर्व उच्चशिक्षित आहेत पण ज्यांची गेल्या १० वर्षात लग्ने झाली आहेत त्यापैकी किती जणांनी अशा टेस्ट करुन घेतल्या आहेत ? माझ्या माहीतीत तर आजपर्यंत कोणीही नाहीये. हेच चित्र कायदा झाला तर नक्कीच बदलू शकेल.

---HIV वाइटच पण मधुमेह जास्त जणांना मारतो.----
अगदीच चुकीची तुलना आहे. मधुमेह हा संसर्गजन्य रोग नव्हे. तुमच्यामुळे तुमच्या पार्टनरला होणार नाही. तसे इतरही अनेक आजार आहेत की ज्यात भरपुर लोक मरतायेत , मलेरिया, कावीळ,कॅन्सर सारखे. पण त्याची तुलना HIV बरोबर करु नये.

--डेलिया, तू म्हणतेस ती माणसं "मॅच्युअर" कॅटेगरीतली असतात. माहित असूनही फसवणारेच जास्त सापडत---- बरोबर, पण ते वाक्य मी दक्षिणाच्या पेशंटच्या 'सिक्रसी' च्या मुद्याला उद्देशुन लिहिले होते. पण अशाच फसवू पहाणार्‍या किन्वा बेपर्वा लोकांच्या सिक्रसी ची चिंता समाजानी किन्वा दुसर्‍या पार्टी नी कशाला का करावी आणि आपल जीव धोक्यात टाकावा नाही का.
--माझी एक अत्यंत जवळची मुंबईत वाढलेली मैत्रिण लग्नासाठी मुलं बघत होती.. तिला विचारलं की तुला एखादा मुलगा लग्नायोग्य वाटला तर त्याला असं सर्टिफिकेट मागशील का.. ती म्हणाली की तिला असं वाटत नाही की कुठला मुलगा हे अ‍ॅक्सेप्ट करेल..
समोरच्याच्या इगोकरता आख्खं आयुष्य पणाला लावणं मला तरी बरोबर वाटलं नाही! मी समजवण्याचा प्रयत्न केला .. पण तिला लॉजिकली ते पटलं तरी she was not ready to go ahead with that ---
हे बहुतेक सगळ्यांच्याच बाबतीत होते. इथे 'टेस्ट हवी' लिहीणार्‍यांपैकी तरी कोणी टेस्ट केलीये का लग्नाआधी ? आम्ही तर नाही. अत्तापर्यंत एकानेही लिहिले नाहीये की आम्ही अशी टेस्ट करुन घेतली होती म्हणुन. लोकांना सांगायला सगळेच पुढे असतात पण स्वतःवर वेळ आली की सगळेच विसरायला होते. म्हणुनच तर कायदा हवा.

हिवरे बाजार या गावाचे नाव तेथिल सुधारणांमुळे बरेच चर्चेत आहे. इतर सुधारणांबरोबरच त्या गावात लग्नापुर्वी HIV टेस्ट करुन घेण्याचा पंचायतीने\गावकर्‍यांनीच नियम बनवला आहे. आणि तो पाळला ही जातो असे ऐकले. अशा सुधारणांसाठी सुशिक्षित असण्याची नव्हे तर समंजस असण्याची गरज आहे.


सिक्रेसी ला भारतात खुप अर्थ नाही आहे. सहज पणे माहिती परभारे सांगितली जाते, एखाद्याने सांगितली तरी आपण त्या प्रकाराला खुप गंभीर गुन्हा मानत नाही (येथे सरळ नोकरी जाते).
लग्ना करण्या अगोदर दोघांनाही परस्परांच्या HIV बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कुंडली दाखवण्याच्याही आधी हा योग जुळवणे. मी माझी (वा भावी पत्निची) परिक्षा केलेली नव्हती पण म्हणुन मी चांगला सल्ला देण्याची संधी दवडणार नाही स्मित. मला आज लग्न करायचे असेल तर जरुर परिक्षा करेल.
कायद्याने खुप काही साधता येईल या बद्दल मी साशंक आहे. गर्भजल परिक्षेवर बंदीचे काय होते? किती लोकं त्यांचे पालन करतात ? आता डॉ. च्या हालचालींवर नजर ठेवायला अजुन एक रोबोट आला आहे.

पण अशाच फसवू पहाणार्‍या किन्वा बेपर्वा लोकांच्या सिक्रसी ची चिंता समाजानी किन्वा दुसर्‍या पार्टी नी कशाला का करावी आणि आपल जीव धोक्यात टाकावा नाही का ?
---- HIV आहे हे अगोदर माहित असेल तर असणारी व्यक्ती टेस्ट करणारच नाही वा ते करण्याची टाळाटाळ करतील. बहुतेक +ve घटनांत त्या व्यक्तीला पण आपण व्याधी ग्रस्त आहोत हे प्रथमच समजणार असेल (म्हणुन धक्कादायकच असेल). प्रत्येक घटना फसवणुक नसणार आहे, त्यामुळे समाजाने सिक्रेसीची, सहानभुतीची तसेच आधाराची चिंता जरुर करायला हवी असे वाटते. लग्न नका करु पण एक मित्र मैत्रिण बनुन आधार जरुर देता येतो. स्वत:चा काही दोष नसतांना पण HIV होण्याची शक्यता असते.

कित्येकांना दूषित रक्त चढवून घेतल्याने मिळालेला असतो... <<<
किमान इस्पितळे तरी रक्त चढवताना इतकी मूलभूत काळजी घेत नाहीत?
---- भारतात रक्त दात्याच्या रक्ताचे स्क्रिनींग होण्याचे प्रमाण किती आहे? सर्व ठकाणी, सर्व चाचण्यांच्या सुविधा अजुनही उपलब्द नसाव्यात - प्रश्न अर्थिक सुबत्तेचा आहे.
गर्व से कहो हम HIV -Ve है ---- या गर्वाची आवश्यकता नाही आहे. डॉ. च्या मताला दुजोरा.

अगदी योग्य मुद्दा उपस्थित केलात ह. बा.,
शहरी भागात ह्याची गरज बिंबवणे आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळवणे(प्रत्यक्ष सहभागा बाबतीत) फारसे कठीण होऊ नये परंतु खरी गरज ग्रामीण भारतात(सुरुवात महाराष्ट्रापासून करायला हरकत नाही) आहे जिथे ह्या सर्व गोष्टींबद्दल एक प्रकारची उदासिनता भरलेली आहे.
मुळात काही काही ठिकाणी अजून मुलीचे लग्न १८ व्या आणि मुलाचे लग्न २१ व्या वर्षी करण्याचा कायदा(?) अंमलात आणला जात नाहीये, तिथे एच. आय. व्ही. विषयी अशा प्रकारची जागरूकता आणणे प्रचंड आव्हानात्मक ठरावे परंतु अवघड नक्कीच नाही....
ह्यावर विचार करता आला तर पाहूया!!
लेखात दिलेल्या संकल्पनेशी संबंधीत उपयुक्त माहिती देणार्‍यांचे स्वागत आहे. आपल्या माहिती, संपर्क, अनुभवाचा आम्हाला प्रत्यक्ष कृतीत उपयोग होणार आहे.>>> १००% अनुमोदन, चांगल्या कामाला आपण उपयोगी कसे पडू ह्याचा सर्व लोकांनी विचार करावा आणि तशा गोष्टी सांगाव्यात.
काम सुरूही झाले आहे...काँट्रीब्युट न करता उगाच नस्त्या शंका उपस्थित करण्यात काय अर्थ आहे?
एका कवितेचा मतितार्थ सांगतो,
"अस्तमानात विलीन होत असताना सुर्यनारायणाने एक प्रश्न केला, "आता माझे काम कोण करील?", स्तब्ध झाला सारा आसमंत.....सगळे एक्दम चिडीचूप!! कोणीच बोलत नाही हे पाहून एक पणती पुढे झाली आणि उद्गारली...........मी करीन परंतु माझ्या कुवतीनुसार!!!"
आम्हाला असे स्वतःहून पुढे येणार्‍या लोकांची नितांत गरज आहे....

ग्रामीण महाराष्ट्रात सुरूवात करण्यासाठी माझं नाव लिवा हणमंतराव !
धन्यवाद!!

ही गोष्ट कायद्याने करण्यापेक्षा समाजजागृतीने करणेच योग्य आहे. म्हणजे लग्न जुळवताना वधु वरांनी परस्परांना आपण अनुरूप आहोत की नाही हे पहाताना रक्तगट व तत्सम गोष्टी तपासून पहाव्यात.
एचआयव्ही बाधित व्यक्तीला वाळीत टाकण्याचेच पुढचे पाऊल असे याचे स्वरूप होउ नये.(जसे एचायव्ही बाधित मातापित्यांच्या +/- मुलांच्या बाबत होताना दिसते, किंवा कुष्ठरोगाबाबत व्हायचे, अजूनही होत असेल.)
कुणाला एचायव्ही + व्यक्तीशी विवाह करायचा असेल, किंवा २ एचायव्ही + व्यक्तींना लग्न करायचे असेल, तर त्यावर बंदी आल्यासारखे होईल.
एचायव्ही बाधित व्यक्तीने आपला संसर्ग अन्य कोणास होणार नाही, याची काळजी मात्र घेतलीच पाहिजे, मग ती व्यक्ती विवाहित असो वा अविवाहित.

माझ्या ओळखीत आहेत २-३ जोड्या लग्नाआधी HIV अन इतर तपासण्या केलेल्या. आम्ही दोघांनीपण केली होती ही टेस्ट अन इतरही काही रुटीन तपासण्या लग्नाआधी.
आपल्याकडे एकंदरीतच एडस या शब्दाला जो सोशल स्टिग्मा आहे, त्यामूळे हे सिक्रसी वैगरे सगळं येतं. नुसता कायदा करून खूप काही होणार नाही, (आणि कायदा म्हटलं की पळवाटा पण येतात)तर सतत बोलल्याने, चर्चेने ही बाब सगळ्यांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे.
सिक्रसीबद्दल म्हणायचं तर याबद्दल खरचं अतिशय वेगळे कायदे आहेत. स्वेच्छा रक्तदान शिबिरांमधून रक्त गोळा केल्यावर त्यावर ही टेस्ट केली जाते. जर एखाद्या सँपलचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर ती बॅग डीस्ट्रॉय केली जाते, पर्म्तू त्या रक्तदात्याला तो /ती HIV पॉझिटिव्ह आह ही माहिती दिली जात नाही. अशी माहिती देणे कायद्याने गुन्हा आहे. अगदी रक्तदान केल्यानंतर जर एखाद्याने रक्तपेढीत येवून विचारले तरी त्याला सांगता येत नाही बहूतेक. त्याला टेस्ट करायचा सल्ला दिला जातो.
आमच्या कॉलेजात ज्यावेळी रक्तदान शिबिरं व्हायचं त्यावेळी तिथले प्राचार्य आईला सांगून ठेवायचे की जर एखादं सँपल पॉझिटिव्ह आलं तर कळवा. वैयक्तिक संबंधांमूळे अशावेळी प्राचार्यांमार्फत आणि यावर काम करणार्‍या मेडिकल सोशल वर्करच्या मार्फत अशा विद्यार्थ्याच्या पालकांना त्याची परत टेस्ट करवण्यासाठी समजवावे लागे. परंतू हे खरंतर कायद्यात बसत नाही.
(आई शासकिय रक्तपेढीत मेडिकल सोशल वर्कर आहे, म्हणून ही थोडीशी माहिती मिळाली)
आपण खरच काही उद्योग केले असतील तर दुसर्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा करायचा आपल्याला हक्क नाही हे जाणून टेस्ट करायला काय हरकत आहे...आणि नसेलही काही केलं तरी दुसरीकडुनही एड्स होण्याची शक्यता आहेच म्हणुनच मी आणि माझ्या नवर्याने टेस्ट केली होती...विशेष काय त्यात?

डॉक्टर तुमची मोलाची मदत होते आहे. आपण मान्यता दर्शविलीत त्याबद्दल आभारी आहे.
मी आणि माझी बायको लग्नापुर्वी सात वर्षे आणि लग्नांतर तीन वर्षे अशी एकूण १० वर्षे एकमेकांना ओळखतो. विश्वास आहेच पण तरीही टेस्ट आम्ही केली होती. कोल्हापुरात असताना तिने आकाशवाणीवर याविषयी एक कार्यक्रमही केला होता.
मी यापुर्वी काही संस्थांसाठी कामे केली. अनाथाश्रम, विटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या संस्थेतल्या मुलांसाठी स्पर्धा घेतल्या त्याना मदत केली. थोडं बहुत काम केलं आहे. आपल्या मित्रा-मित्रांची अशी संस्था असावी अशी माझी मनिषा आहे. मी एकदा शिरोळच्या महापुरात नुकसान झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी चार पाच मित्रांसोबत गेलो तर तिथे आम्हाला कोणत्या संस्थेतून आला? ओळ्खपत्र दाखवा इ. प्रश्न विचारून आमची मदतही घेतली नाही. तुम्ही चोरही असू शकता असेही सुनावले गेले. त्यामुळे एक कायदेशीर शिक्का मारून घेणे गरजेचे आहे.
या कामांसाठी अगदी गटगही कॅन्सल करावा लागणार नाही. एवढे फ्लेक्झिबल नियोजन असेल. ज्याला जसे जमेल तसे काम वयक्तिक पातळीवर सुरू करावे. फक्त नोंदणी केलीत तर आनंदच आहे.
याचिका दाखल करणे, कायद्याची मागणी करणे, इ. साठी पुवेका केव्हापासून तयार आहेत.
दोन फोटो, ओळखपत्र, संपर्क, पत्ता. पाठवून देणे. एवढेच तुमचे काम असेल.
विजयजी, किश्या, डॉक्टर आपली सुरूवात झाली आहेच. त्याबद्दल आपण एकमेकांचे आभारी आहोत.

**************************************************************************************

अशी अनेक मते-मतांतरे यांची ओळख करून घेतल्यानंतर आम्ही काही समविचारी मित्र-मैत्रीणींनी एकत्र येवुन प्रत्यक्ष कृतीला हात घालायचे ठरवले. आणि तिथेच "मैत्र जिवांचे सामाजिक संस्थेची" मुहुर्तमेढ झाली.

धन्यवाद.

विशाल विजय कुलकर्णी
सचिव
'मैत्र जिवांचे सामाजिक संस्था'
भ्रमणध्वनि क्र.: ९९६७६६४९१९
विरोप पत्ता : maitrajivanche.ngo@gmail.com

 
 




No comments:


"सामाजिक संस्था म्हणजे समाजाची, समाजाच्या हितासाठी काम करणारी संस्था. आपण फक्त त्या समाजाचे प्रतिनिधी म्हणुन काम करत असतो. आपले काम कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता करत राहणे एवढेच आपले कर्तव्य."

कृपया नोंद घ्यावी की ब्लॉगवर देण्यात आलेल्या माहिती आणि माहितीविषयक बाह्य दुव्यांवरील माहितीच्या वैधतेबद्दल "मैत्र जिवांचे सामाजिक संस्था, मालखेड, जि. सातारा" कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही. या माहितीवर अंमल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा होवू शकणार्या कुठल्याही परिणामाला संस्था जबाबदार राहणार नाही. आपली इच्छा असल्यास संस्थेचे डॉक्टर्स आपल्याला हवी ती सर्व माहिती विनामुल्य अथवा अतिशय वाजवी दरात (जर बाहेरील डॉक्टरचे नाव सुचवले तर) पुरवू शकतील. इच्छुकांनी कृपया maitrajivanche.ngo@gmail.com या विरोप पत्त्यावर संपर्क साधावा.

"मैत्र जिवांचे सामाजिक संस्था", मु.पो. मालखेड, ता. कराड, जि. सातारा.